https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

सर्वांनी ग्राहक चळवळीमध्ये सहभागी व्हावे : चंद्रकांत झगडे

0 218

गुहागर तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा

गुहागर : देशाच्या राष्ट्रपतींपासून ते सर्वसामान्य जनता हे सर्वच ग्राहक असतात. जाहिरातींच्या भुलभुलय्यामध्ये प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. ग्राहक हक्काबरोबरच कर्तव्याचा ही विचार करून सामाजिक दृष्टिकोन ठेवून सर्वांनी ग्राहक चळवळीमध्ये सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांताचे अध्यक्ष चंद्रकांत झगडे यांनी केले.


गुहागर तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार श्री. परीक्षित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री. झगडे म्हणाले की, चाणक्य नीतीमध्ये ग्रंथांमधून ग्राहक हिताचा उल्लेख आढळतो. 1974 साली संस्थापक बिंदू माधव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. ग्राहक संरक्षण कायदा हे सर्वसामान्याला मिळालेले शस्त्र असून ते सर्वांना वापरता आले पाहिजे. या कायद्याच्या माध्यमातून माहिती, निवड करण्याचा अधिकार, बाजू मांडण्याचा व अन्याय विरोधी दाद मागण्याचा अधिकार ग्राहकाला प्राप्त झाला आहे.


गेली ४९ वर्ष ग्राहक पंचायत ग्राहक जागृतीसाठी संपूर्ण देशभर सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहे. देशातील ग्राहक क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी संघटना असून लाखो कार्यकर्ते निःस्वार्थपणे राष्ट्रहित लक्षात घेऊन सातत्यपूर्ण कार्य करत आहेत.

ग्राहक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना तहसीलदार परीक्षित पाटील, सोबत ग्राहक पंचायतीचे चंद्रकांत झगडे


ग्राहक जागृतीसाठी घ्यावयाची दक्षता यामध्ये भडक जाहिराती, सेल यापासून दूर राहून वस्तू खरेदी करताना योग्य पावती घेणे, गॅरेंटी, वारेंटी कार्ड घेणे, वजन, गुणवत्ता, मॅन्युफॅक्चरींग डेट, एक्सपायरी डेट , एमआरपी इ. बाबी तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच विविध सेवा दर्जेदार मिळण्यासाठी ग्राहकाने आग्रह धरला पाहिजे. यातून आपणास काही समस्या निर्माण झाल्यास आपण संघटनेकडे संपर्क करू शकता. ग्राहक म्हणून आपल्या न्याय्य हक्कांसाठी सामाजिक कार्यासाठी आपण ग्राहक चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन श्री. झगडे यांनी केले.


तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी पुढील काळात मोठा कार्यक्रम घेऊन ग्राहक चळवळ उभी करणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्राहक दिनानिमित्त जागो ग्राहक या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमधील प्रथम सान्वी गोयथळे, द्वितीय आर्या गोयथळे, तृतीय जिया कोलकांड, उत्तेजनार्थ रेषा चौगुले व अनुष्का देवकर यांना, तर रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम शमिका गोवळकर, द्वितीय कार्तिकी भोसले, तृतीय ग्रंथा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार महेंद्र सावर्डेकर, पुरवठा निरीक्षक समृद्धी पेंडसे, रेशन दुकान संघटना अध्यक्ष बाळकृष्ण ओक, सचिन वळंजू, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, गुहागर आगाराचे स्वप्निल शिंदे व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.