लिंगायत बंधूंच्या चित्रशाळेत बाप्पा आकार घेऊ लागले!
आजोबांच्या पश्चात नातवंड आणि मुलेही साकारु लागली गणराय
संगमेश्वर : गणेशोत्सवाला अवघे काही महिने शिल्लक असताना अनेक चित्रशाळेत बाप्पांच्या मूर्तीवर रंगकाम करण्याची लगबग सुरू झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील लिंगायत बंधूंच्या चित्रशाळेत सुध्दा बाप्पा रुप धारण करु लागलेत. या चित्रशाळेत शाडूच्या मातीपासून ते पीओपीच्याही मूर्ती मिळतात. जास्त प्रमाणात शाडू मातीच्या मूर्तींची संख्या जास्त आहे, असे उदय लिंगायत यांनी सांगितले.
यंदा या चित्रशाळेत २५० मूर्ती आहेत. या चित्रशाळेचे सर्वेसर्वा कै. शिवाजी लिंगायत यांच्या हस्तकलेतून ही चित्रशाळा ७० वर्षापुर्वी सुरू झाली होती. गेल्या वर्षी गणपतीचे काम करताना वयाच्या ८७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. या चित्रशाळेत मातीच्या मूर्ती घडवताना साच्याचा वापर केला जात नाही हे वैशिष्ट्य आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी काही दिवस शिल्लक असताना ग्रामीण भागात गणेशभक्तांच्या सेवेसाठी लिंगायत बंधूंची चित्रशाळा अगदी २४ तास उपलब्ध असते.
श्री. उदय, उल्हास, उमेश यांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे. उदय लिंगायत हे रत्नागिरीमध्ये शिर्के हायस्कूल येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते सुट्टीत आल्यावर गणपती बाप्पा काढण्यात मग्न होतात.
प्रणय, प्रथमेश, विनय, हेमल हे सुद्धा कामात मग्न असतात
प्रथमेश हा कलाकार आहे. तो सध्या सावर्डे येथे शिल्पकला शिकत आहे. त्याने महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन २०२२ मध्ये पारितोषिक मिळवले आहे. वाडीतील सर्व माणसांचे सहकार्य या सर्वांना मिळते.