https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

सी. डब्लू. सी. प्रशासन आणि बजेट टर्मिनल प्रा. लि. विरोधात कामगारांचे साखळी उपोषण

0 60

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रश्न सुटला नाही

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पागोटे येथे सेंट्रल वेअर हाउसिंग कार्पोरेशन (CWC) ही कंपनी कार्यरत आहे. पूर्वी स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले जायचे. जसे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार बदलत गेले तसे कामगांरावर प्रकल्पग्रस्तांवर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय सुरू झाले. ३० वर्षापासून काम करीत असलेल्या प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक कामगारांना डावलून ज्यांच्या या प्रकल्पाशी संबंध नाही आणि या वेयर हाउसमध्ये ज्यांनी या यापूर्वी कधी काम केलेले नाही, अशा परप्रांतीय कामगारांना घेउन नोकरभरती करून सी. डब्लू.सी कंपनीतील गोडावून मध्ये प्रत्यक्ष लोडिंग अनलोडिंगचे काम सुरू केले आहे. त्यामुळे स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

केवळ स्वार्थापोटी सीडब्लूसी कंपनी प्रशासन व ठेकेदार हया गोष्टी करीत आहेत.त्यामुळे सुरवातीपासून काम करीत असलेल्या २५० स्थानिक कामगांरांना कामावर त्वरीत रुजू करून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी कामगारांतर्फे सीडब्लूसी वेअर हाउसच्या गेटवर दि २० नोव्हेंबर २०२३ पासून साखळी उपोषण सुरु झाले आहे. साखळी उपोषणाने प्रश्न सुटला नाही तर दि २७ नोव्हेंबर २०२३ पासून कामगारांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आणि त्यानेही प्रश्न सुटला नाही तर दि २९ नोव्हेंबर २०२३ पासून कुटूबांसह कामगार प्रश्न सुटेपर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे हे साखळी उपोषण अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. यातील उपोषणकर्ते कामगार व सी डब्लू सी प्रशासन, बजेट टर्मिनल प्रा. लि प्रशासन यांची संयुक्त बैठक कामगार आयुक्त कार्यालय चेंबूर येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपोषण कर्ते कामगार हजर होते मात्र कंपनी प्रशासनातर्फे एकही अधिकारी किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नव्हते. या बैठकीतून काय निष्पन्न होणार याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले होते. मात्र सी डब्लू सी प्रशासन आणि बजेट टर्मिनल प्रा. लि.कंपनी प्रशासनाचे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने आता पुढे काय होणार याबाबत कामगारांनी चिंता व्यक्त केली आहे.कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, सेक्रेटरी संतोष ठाकूर, खजिनदार विश्वास घरत, उपाध्यक्ष किरण घरत, उपाध्यक्ष अशोक पाटील, सल्लागार दिपक ठाकूर, सदस्य- राजेंद्र ठाकूर,हनुमान पाटील,रमेश ठाकूर,शिवाजी म्हात्रे,भानुदास पाटील,जगदिश म्हात्रे,संतोष पाटील, जगदीश ठाकूर यांच्यासह कामगार,कर्मचारी त्यांचे कुटुंब मोठया संख्येने आमरण उपोषणात सहभागी होते.

आतापर्यंत माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर,कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील,माजी पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर,शिवसेना द्रोणागिरी शाखाप्रमुख जगजीवन भोईर,शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, शिक्षक नेते नरसू पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, ज्येष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील आदींनी तसेच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊ आपला जाहिर पाठिंबा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.