- मारुती मंदिर येथून निघणार रॅली ; महायुतीच्या प्रमुख नेत्यांची असणार उपस्थिती
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रासप, आरपीआय आणि रयत क्रांती पक्ष यांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन अर्ज सादर करणार आहेत. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली.
यावेळी सावंत म्हणाले कि, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या नावाची घोषणा गुरुवारी सकाळी भाजपने केल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. ना. राणे हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे, शिवसेना नेते किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवडणूक समन्वयक अजित यशवंतराव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, आरपीआय, रासप, रयत क्रांती या पक्षाचे महत्वाचे नेते पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यावेळी उपस्थित राहणर आहेत.
शुक्रवारी सकाळी १० वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ना. राणे यांची रॅली माळनाका, जेलनाका मार्गे जयस्तंभ येथे पोहोचेल. निवडक नेत्यांसह नारायण राणे हे उमेदवारी अर्ज दाखल करतील तर जयस्थंभ येथेच ना. राणे, ना. चव्हाण, ना. सामंत आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
या रॅलीमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील दोड्डामार्ग ते चिपळूण येथील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार असून त्यानुसार जय्यत तयारीला दोन्ही जिल्ह्यात सुरुवात झाली आहे असेही श्री. सावंत यांनी सांगितले.