Ultimate magazine theme for WordPress.

जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा!

3 433
  • पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे केले उद्घाटन
  • पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून २ अमृत भारत एक्सप्रेस आणि ६ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला
  • मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे स्वागत करण्यात आले

पंतप्रधानांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवलेली अमृत भारत एक्सप्रेस

मुंबई : पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी दि. ३०.१२.२०२३ रोजी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून वेगवेगळ्या शहरांदरम्यान २ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. जालना ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला देखील त्यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलेल्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे

१. दरभंगा – अयोध्या – दिल्ली (आनंद विहार टर्मिनल) अमृत भारत एक्सप्रेस
२. मालदा टाउन – बंगळुरू छावणी अमृत भारत एक्सप्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ३०.१२.२०२३ रोजी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून विविध शहरांदरम्यानच्या ६ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
तपशील खालीलप्रमाणे:-

१. श्री माता वैष्णो देवी कटरा – नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस
२. अमृतसर – दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस
३. कोईम्बतूर – बंगळुरू छावणी वंदे भारत एक्सप्रेस
४. मंगळुरु – मडगाव (गोवा) वंदे भारत एक्सप्रेस
५. अयोध्या धाम-आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) वंदे भारत एक्सप्रेस
६. जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमात सामील झाले.

दि. ३०.१२.२०२३ रोजी जालना – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाचे मध्य रेल्वेच्या मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशा विविध स्थानकांवर खासदार, आमदार, पालकमंत्री, शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले.

ही वंदे भारत एक्सप्रेस सेवा मध्य रेल्वेसाठी ६वी आणि महाराष्ट्र राज्याची सातव्या क्रमांकाची सेवा आहे.

वंदे भारत ट्रेनचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे जल्लोषात आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्री राहुल शेवाळे, विधानसभा सदस्या श्रीमती यामिनी जाधव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ संपन्न झाला. मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री चित्तरंजन स्वैन यांनी स्वागत भाषण केले तर मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री रजनीश गोयल यांनी आभार मानले.

दादर येथे विधानसभेचे सदस्य श्री कालिदास कोळंबर हे स्वागत समारंभास उपस्थित होते.

ठाणे येथे खासदार राजन विचारे आणि विधानसभा सदस्य संजय केळकर हे स्वागत समारंभास उपस्थित होते.

नाशिकरोड येथे विधानसभा सदस्या (नाशिक पश्चिम), श्रीमती सीमा महेश हिरे आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग श्रीमती. इती पांडे यांच्या उपस्थितीत स्वागत समारंभाला करण्यात आला.

मनमाड जंक्शन येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या ऑनलाइन पद्धतीने स्वागत समारंभात सहभागी झाल्या. यावेळी विधानपरिषद सदस्य श्री नरेंद्र दराडे आणि भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका श्रीमती. इति पांडे.

जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस:-

जालना – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची नियमित सेवा सुरू होणार आहे. दि. ०१.०१.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि दि. ०२.०१.२०२४ पासून जालना येथून.

जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.

गाडी क्रमांक २०७०६ मुंबई – जालना वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दररोज (बुधवार वगळता) १३.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.३० वाजता जालना येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक २०७०५ जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस जालना, दररोज (बुधवार वगळता) ०५.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि औरंगाबाद.

संरचना: १ वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह श्रेणी आणि 7 वातानुकूलित चेअर कार

जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Leave A Reply

Your email address will not be published.