Ultimate magazine theme for WordPress.

कलाकृतीतून कोकणचा निसर्ग कलारसिकांच्या मनाला आनंद देईल :  प्रकाश राजेशिर्के

0 383

संगमेश्वर दि. १९ ( प्रतिनिधी ) :  डॉ. प्रत्यूष चौधरी यांच्या प्रद्योत आर्ट गॅलरीमध्ये निसर्ग चित्रकार विष्णू परीट आणि माणिक यादव यांच्या प्रदर्शनातील चित्रे पाहून कोकणातील कला रसिकांच्या मनाला नक्कीच आनंद होईल. हे दोन्ही चित्रकार वास्तववादी आहेत. कामातील सातत्यामुळे त्यांच्या कलाकृती एका उंचीवर जाऊन पोहोचल्या आहेत. डॉ. प्रत्युष चौधरी यांनी कलाकारांसाठी आर्ट गॅलरी उपलब्ध करून देऊन कलाकारांना जणू राजाश्रयच दिला आहे. कोकणातील कलाकारांनी प्रज्योत आर्ट गॅलरीत आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजश्री यांनी केले.

रत्नागिरी टीआरपी येथील मित्रा संकुल येथे असणाऱ्या प्रद्योत आर्ट गॅलरीत आज निसर्ग चित्रकार विष्णू परीट आणि माणिक यादव यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रकाश राजशिर्के, डॉ. प्रत्यूष चौधरी, डॉ. योगिता चौधरी, रत्नागिरीतील चित्रकार कलाशिक्षक आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रकाश राजेशीर्के हे बोलत होते.

.कोकणात वर्षभर वेगवेगळ्या ऋतूमध्ये निसर्ग आपली अप्रतिम नजाकत पेश करत असतो. या विविध ऋतूंचे दर्शन ‘ ऋतुरंग ‘ या चित्र प्रदर्शनातून कलारसिकांना पुढील आठवडाभर होणार आहे. आपल्या चित्रांविषयी बोलताना चित्रकार माणिक यादव म्हणाले , कोकणच्या निसर्गाने आपल्या कुंचल्याला अधिक गती मिळत गेली. गेली ३२ वर्ष आपण जलरंगामध्ये कलाकृती साकारण्याचा प्रयत्न करत आहोत. एवढे वर्ष काम केल्यानंतर आता चित्रात काय येणे अपेक्षित आहे आणि काय नको, हे आपल्या लक्षात येऊ लागले आहे. दुसरे चित्रकार माणिक यादव यांनी आपल्या मनोगतात, चित्रकार बोलण्यापेक्षा आपल्या संवेदनशील मनातून ज्या कलाकृती साकारतो, त्याच अधिक बोलक्या असतात असे स्पष्ट केले. दोन्ही कलाकारांनी ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशशिर्के आणि डॉ. प्रत्युष चौधरी डॉ. योगिता चौधरी यांना मनापासून धन्यवाद दिले. कला प्रदर्शनासाठी चित्रकार रवींद्र मुळये, दिलीप भाताडे , रुपेश पंगेरकर , बबन तिवडे ,उदय लिंगायत , शिळकर, अमित सुर्वे , प्रदीप कुमार देडगे, अवधूत खातू , सिद्धांत चव्हाण, दिलीप पवार , प्रदीप परीट , सौ. वनिता परीट , सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थी, आर्ट गॅलरीची क्युरेटर मयुरी घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरीतील कलाप्रेमी आणि कलारसिक उद्योजक विवेक शानभाग यांनी सायंकाळी उशिरा आर्ट गॅलरीला भेट देऊन दोन्ही कलाकारांच्या कलाकृतींचे भरभरून कौतुक केले.

विशेष म्हणजे आज पटवर्धन हायस्कूलचे कलाशिक्षक रुपेश पंगेरकर यांनी विष्णू परीट आणि माणिक यादव यांच्या दोन कलाकृती खरेदी करून प्रदर्शनाची उत्तम सुरुवात केली. प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी रत्नागिरी जोरदार पावसाला आणि वाऱ्याला सुरुवात झाली. याच दरम्यान वीज प्रवाह देखील खंडित झाला. मात्र जिद्दी कलाकारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मेणबत्ती आणि मोबाईलच्या फ्लॅश लाईट मध्ये करण्यात आले. कलाकार हा कोणत्याही अडचणीवर मात करण्यात नेहमी यशस्वी ठरतो, हाच संदेश यातून उपस्थित कलारसिकांना मिळाला

Leave A Reply

Your email address will not be published.