Ultimate magazine theme for WordPress.

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था, मुंबई व मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

0 422

मुंबई : भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था (CIFE), मुंबई व मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यात शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण याविषयीचा सामंजस्य करार ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रालय, मुंबई झाला. या सामंजस्य करारावर महाराष्ट्र राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था, मुंबईचे संचालक डॉ. रविशंकर सी. एन. व आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन डॉ. अतुल पाटणे (IAS) यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या करारानुसार, १. महाराष्ट्रातील भूजलाशयीन क्षारपड जागेत मत्स्यसंवर्धन २. नवीन मत्स्य संवर्धन तंत्रज्ञानावर आधारीत मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांचा क्षमता विकास प्रशिक्षण ३. मच्छीमार व मत्स्य व्यावसायिकांचे क्षमता विकास प्रशिक्षण ४. मच्छीमार व मत्स्य संवर्धकांकरीता मदत सेवा केंद्राची निर्मिती ५. गोड्या पाण्यातील माशांकरीता केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था (CIFE), अंधेरी-वर्सोवा, मुंबई येथे स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करणे. ६. शोभिवंत मासे संवर्धन करणे. ७. कमी प्रतीच्या/स्वस्त माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे. ८. महाराष्ट्रातील जलीय जैवविविधता आणि मत्स्यसंपत्तीचे मूल्यांकन आणि संवर्धन करणे. ९. पदव्युत्तर आणि आचार्य विद्यार्थ्यांना संशोधनात सहकार्य/मदत करणे. १०. स्थानिक भाषेत प्रमाणपत्र/डिप्लोमा अभ्यासक्रम आणि सामग्री विकासीत करणे याबाबत केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था, मुंबई व मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यात उभयपक्षी सामंजस्याने काम पार पाडले जाणार आहे.


या कराराच्या स्वाक्षरी समारंभाला मत्स्य व्यवसाय विभागाचे सह-आयुक्त श्री. युवराज चौगुले व विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. तर केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था, मुंबईच्या सामाजिक विज्ञान विभाग प्रमुख डॉ. अर्पिता शर्मा, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. के. पानी प्रसाद, डॉ. ए. के. जैसवार, शास्त्रज्ञ डॉ . कपिल सुखदाने, डॉ. करण रामटेके आदी उपस्थित होते.


यावेळी मा. मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना ‘महाराष्ट्रातील सरदार सरोवर जलाशयाच्या भागामध्ये पर्यावरणीय स्थिती, संवर्धन आणि मत्स्यपालन वाढीचे संशोधन’ तसेच मत्स्य बियाणे प्रमाणन संबंधित कार्याची माहिती देण्यात आली. यावेळी केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था, मुंबईचा आचार्य अभ्यासक्रम विद्यार्थी श्री. शुभम सोनी तसेच त्यांचे मार्गदर्शक डॉ. अर्पिता शर्मा व डॉ. मार्टिन झेवियर यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमावेळी माशांच्या टाकावू कातडीपासून विकसित केलेल्या ‘शुभलेदर’ या नामांकनाच्या वस्तू ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आल्या. या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची निर्मिती, उपयुक्तता, आणि टिकाऊपणा याचे मंत्री महोदयांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.