रत्नागिरी : राजापूर-लांजा-साखरपाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना आता साळवी यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. दि. १० फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक १० फेब्रुवारी रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत.
दुसऱ्या बाजूला साळवींचा शिंदे गटात पक्षप्रवेश ही केवळ अफवा असल्याची प्रतिक्रिया राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. त्यामुळे श्री. साळवी हे शिंदे गटातील पक्षप्रवेशाचा मुहूर्त साधणार की, यावेळीही पक्षप्रवेश लांबणीवर पडणार, हे येत्या २ दिवसात स्पष्ट होणार आहे.