100 दिवस कृती आराखडा आढावा बैठक
रत्नागिरी : आपण सर्वजण शासकीय नोकर आहोत. येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काम झाले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात. आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा, असे निर्देश पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव (साप्रवि) सीमा व्यास यांनी दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात 100 दिवस कृती आराखड्यासंदर्भात श्रीमती व्यास यांनी आज आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
आढावा घेतल्यानंतर पालक सचिव श्रीमती व्यास म्हणाल्या, सर्वांनी चांगले सादरीकरण केले आहे. इथली टीम चांगलं काम करत आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या कृती आराखड्याचा गुड गव्हर्नन्साठी प्राधान्याने अंमलबजावणी करावी. सर्वसामान्य जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपण शासकीय नोकर आहोत. सकारात्मतक विचार करुन, येणाऱ्या जनतेची कामे झाली पाहिजेत, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. कार्यालयातील वातावरण आनंदी, प्रसन्न असले पाहिजे. मानसिक, शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी योगा मेडिटेशन यासारखे कार्यक्रम घ्यावेत. स्वत:ची काळजीही घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांच्यासह विविध विभागप्रमुखांनी 7 कलमी कृती कार्यक्रमावर आधारित 100 दिवस कृती आराखडा याविषयी संगणकीय सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी पुष्पगुच्छ आणि ‘विकास पर्व’ देऊन सुरुवातीला पालक सचिव श्रीमती व्यास यांचे स्वागत केले. राजापूर उपविभागीय अधिकारी डॉ. जस्मिन यांनी आभार प्रदर्शन केले.