https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गणेशोत्सवाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी रेखाटल्या ७६५ कलाकृती!

0 62
  • पैसा फंडच्या कलाविभागाचा उपक्रम
  • कोलाज निर्मितीवर भर
  • निरीक्षण क्षमता वाढविण्याचा उद्देश

संगमेश्वर दि. २७ : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंडच्या कला विभागाच्या वतीने गणेशोत्सवाच्या सुट्टीत चित्र रेखाटनाचा उपक्रम राबवून बालकलाकारांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे . या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जवळपास ७६५ कलाकृती साकारुन स्वतः मधील सुप्त गुणांना आकार देण्याचा प्रयत्न केला आहे . कला विभागाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे व्यापारी पैसा फंड संस्था आणि प्रशालेच्या वतीने कौतूक करण्यात आले आहे.

शाळेला असणारी सुट्टी ही केवळ मौज मज्जा करण्यासाठी नसून या सुट्टीतही आपण काहीतरी नवीन केले पाहिजे या उद्देशाने पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागाने पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कला विषयक एक उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार निसर्गाकडे अथवा सजीव निर्जीव अशा कोणत्याही वस्तूकडे पाहताना विद्यार्थ्यांची निरिक्षण क्षमता वाढावी हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश होता . सुट्टीत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान तीन चित्र रेखाटण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

कोलाज चित्र हा विषय संयम शिकविणारा तसेच निरिक्षण शक्ती वाढविणारा असल्याने जाहिरातींचे , जुन्या कॅलेंडरचे अथवा साप्ताहिक – मासिकां मधील टाकाऊ रंगीत कागदाच्या तुकड्यांमधून कोणतेही कोलाज चित्र साकारावे यासाठी विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले. दोन दिवसांमध्ये पुरेसा वेळ देत एक कलाकृती तयार करायची. एकूण सहा दिवसांमध्ये प्रत्येकाने तीन कलाकृती तयार कराव्या असे उद्दीष्ट देण्यात आले होते . यानुसार सुट्टीचा उपयोग आपला छंद जोपासण्यासाठी अथवा त्यामधून नवनवे अनुभव घेण्यासाठी करावा असे आवाहन करण्यात आले . विद्यार्थ्यांनी प्रथम टाकाऊ रंगीत कागद शोधले आणि कागदांच्या उपलब्धतेनुसार अप्रतिम अशा कलाकृती तयार केल्या.

प्रशालेतील पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून गणेशोत्सवाच्या सुट्टीत एकूण ७६५ कलाकृती तयार केल्या . सुट्टीनंतर शाळा सुरु झाली त्या पहिल्याच दिवशी या सर्व कलाकृती प्रशालेच्या कलाविभागाकडे जमा केल्या . यामध्ये कोलाजच्या माध्यमातून संकल्प चित्र, वस्तू चित्र, सजीव – निर्जीव कोणतेही आकार तयार करत बालकलाकारांनी आपल्या सुप्त गुणांना चालना देत सुंदर अशा कलाकृती तयार केल्या . सुट्टीत दिलेल्या या उपक्रमामुळे आमची निरिक्षण क्षमता वाढली तसेच आमच्यातील विविध कल्पनांना चालना मिळाली अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या . चित्राकृती तयार करताना आलेल्या विविध अनुभवांबाबत विद्यार्थ्यांनी कलेच्या तासाला आपली मतं व्यक्त केली.

उपक्रमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती म्हणजे प्रशालेसाठी एक उत्तम संग्रह असून यातील उत्तमोत्तम कलाकृतींचा समावेश कलाविभागा तर्फे २६ जानेवारी २०२४ रोजी प्रकाशित होणाऱ्या २४ व्या कलासाधना या चित्रकला वार्षिक मध्ये केला जाणार असल्याचे कला विभागातर्फे सांगण्यात आले. कला विभागाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संस्था सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी कौतूक करत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप मारली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.