https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

दीपावलीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी रेखाटल्या ३५०० कलाकृती

0 56

  • ४५० शुभेच्छा पत्रांची निर्मिती
  • पैसा फंडच्या कलाविभागाचा उपक्रम

संगमेश्वर दि . ३० : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागा तर्फे दीपावलीच्या सुट्टीत शुभेच्छा पत्र तयार करणे आणि चित्र रेखाटनाचा उपक्रम राबवून बालकलाकारांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे . या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जवळपास ३४९८ कलाकृती साकारुन स्वतः मधील सुप्त गुणांना आकार देण्याचा प्रयत्न केला आहे . याबरोबरच दीपावली सणानिमित्त विद्यार्थ्यांनी ४४६ शुभेच्छा पत्र तयार करुन आपल्या आप्तांना अनोखा शुभसंदेशही दिला आहे.

कलेच्या माध्यमातून अर्थार्जन करता येते , हे विद्यार्थ्यांना अनुभवता यावे , हा दीपावली सुट्टीतील या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता . विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या सुंदर कलाकृती पाहून पालकांनी त्यांच्या कलेचे कौतूक करावे याबरोबरच घरी येणाऱ्या आप्तांनी विद्यार्थ्यांची कला पाहून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप द्यावी एवढ्या उत्तमोत्तम कलाकृती विद्यार्थ्यांनी साकारल्या . एवढेच नव्हे तर काही मुलांना त्यांच्या कलाकृतींचे कौतूक म्हणून पालक आणि आप्तांकडून बक्षीस देखील मिळाले.

शाळेला असणारी सुट्टी ही केवळ मौज मज्जा करण्यासाठी नसून या सुट्टीतही आपण काहीतरी नवीन केले पाहिजे , या उद्देशाने पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागाने पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कला विषयक एक उपक्रम राबविण्याचे ठरविले . त्यानुसार निसर्गाकडे अथवा सजीव निर्जीव अशा कोणत्याही वस्तूकडे पाहताना विद्यार्थ्यांची निरिक्षण क्षमता वाढावी हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश होता . सुट्टीत सहावी ते आठवीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान सहा चित्र रेखाटण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते . याबरोबरच नववी ते दहावी मधील प्रत्येक विद्यार्थ्याने बारा चित्रे रेखाटण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते .

कोलाज चित्र हा विषय संयम शिकविणारा तसेच निरिक्षण शक्ती वाढविणारा असल्याने जाहिरातींचे , जुन्या कॅलेंडरचे अथवा साप्ताहिक – मासिकां मधील टाकाऊ रंगीत कागदाच्या तुकड्यांमधून कोणतेही कोलाज चित्र साकारावे यासाठी विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले . दोन दिवसांमध्ये पुरेसा वेळ देत एक कलाकृती तयार करायची . एकूण बारा दिवसांमध्ये प्रत्येकाने सहा कलाकृती तयार कराव्यात असे उद्दीष्ट देण्यात आले होते . यानुसार सुट्टीचा उपयोग आपला छंद जोपासण्यासाठी अथवा त्यामधून नवनवे अनुभव घेण्यासाठी करावा , असे आवाहन करण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी प्रथम टाकाऊ रंगीत कागद शोधले आणि कागदांच्या उपलब्धते नुसार अप्रतिम अशा कलाकृती तयार केल्या . यामध्ये वर्तमान पत्राच्या कागदांचा देखील विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने वापर केला .

प्रशालेतील सहावी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून दीपावलीच्या सुट्टीत एकूण १२०६ कलाकृती तयार केल्या . तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळून २२९२ कलाकृती तयार केल्या . सर्व विद्यार्थ्यांच्या एकूण कलाकृतींची संख्या ३४९८ एवढी झाली . दीपावली सणामध्ये फराळाचे विविध पदार्थ करुन आई खूप दमते . आईसाठी दीपावलीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाने स्वतःच्या हस्त कौशल्यातून साकारलेले एक छानसे शुभेच्छा पत्र द्यायचे आणि आईच्या चेहऱ्यावर तरळणारा आनंद अनुभवायचा असा आणखी एक उपक्रम कला विभागाच्या वतीने पाचवी ते दहावीतील प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आला होता . त्यानुसार ४४६ विद्यार्थ्यांनी आपल्या आईला स्वतः तयार केलेल्या शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून दीपावलीच्या सर्वांगसुंदर शुभेच्छा दिल्या . आईला देखील आपल्या पाल्याने स्वतः तयार केलेले शुभेच्छा पत्र पाहून समाधान मिळाले .

दीपावली सुट्टीनंतर शाळा सुरु झाली त्या पहिल्याच दिवशी या सर्व कलाकृती प्रशालेच्या कलाविभागाकडे जमा केल्या . यामध्ये कोलाजच्या माध्यमातून संकल्प चित्र , वस्तू चित्र , सजीव – निर्जीव कोणतेही आकार , प्राणी – पक्षी तयार करत बालकलाकारांनी आपल्या सुप्त गुणांना चालना देत सुंदर अशा कलाकृती तयार केल्या . सुट्टीत दिलेल्या या उपक्रमामुळे आमची निरिक्षण क्षमता वाढली तसेच आमच्यातील विविध कल्पनांना चालना मिळाली याचबरोबर आईला शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून आनंद देता आला अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या . चित्राकृती तयार करताना आलेल्या विविध अनुभवांबाबत विद्यार्थ्यांनी कलेच्या तासाला आपली मतं देखील व्यक्त केली .

उपक्रमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती म्हणजे प्रशालेसाठी एक उत्तम संग्रह असून यातील उत्तमोत्तम कलाकृतींचा समावेश कलाविभागा तर्फे २६ जानेवारी २०२४ रोजी प्रकाशित होणाऱ्या २४ व्या कलासाधना या चित्रकला वार्षिक मध्ये केला जाणार असल्याचे कला विभागातर्फे सांगण्यात आले . कला विभागाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संस्था सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी कौतूक करत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप मारली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.