रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मागील अनेक महिन्यांपासून उमेदवारीसाठी दावा करीत आलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत यांच्या नागपूर भेटीची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत अगदी अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या उमेदवारीसाठी किरण तथा भैय्या सामंत प्रयत्नशील आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दावा करीत प्रचार कार्यही याआधीच सुरू केले आहे.
दुसऱ्या बाजूला महायुतीकडून शिंदे गटामार्फत किरण सामंत यांनी आपल्या उमेदवारीसाठी दवा केला होता. काही दिवसापूर्वीच मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकी नंतर या जागेवर नारायण राणे यांचे नाव आघाडीवर राहिले आहे.
मात्र, पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी एका खासगी विशेष विमानाने नागपूर गाठले असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विदर्भ भेटीवर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत त्यांनी आपल्या उमेदवारीचा दावा करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
- हे देखील वाचा : Konkan Railway | उधना-मंगळुरू स्पेशल फेअर ट्रेन ५ जूनपर्यंत धावणार!
- कोकण रेल्वे मार्गावर समर स्पेशल गाड्यांच्या आणखी ३२ फेऱ्या जाहीर!
- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ८ ऐवजी १६ डब्यांची चालवावी
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे की, किरण सामंत यांच्या नावाची अधिकृत घोषणा होते, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व घडामोडींमध्ये शेवटी अपेक्षेप्रमाणे निर्णय आला नाही तरी भैया सामंत है अपक्ष उमेदवार म्हणून लढतील, असेही मतदारसंघात बोलले जात आहे.