रत्नागिरी : रत्नागिरीतील हातीस येथील प्रसिद्ध पीर बाबरशेख बाबांचा उरूस २४ आणि २५ फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उरूसाला राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यासाठी येथे जय्यत तयारी सुरू आहे.
दर्याच्या ठिकाणी भाविकांना जाण्यासाठी प्रशासन स्तरावरून खास नियोजन करण्यात आले आहे. उरूसानिमित्त रत्नागिरी बसस्थानकातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परजिल्ह्यातून अनेक विक्रेते येथे दोन दिवस अगोदरच येणार आहेत. इब्राहिमपट्टणम येथील सय्यद व मानकरी मुस्लिम बांधवाचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
त्यानंतर कबरीवर चुन्याचा लेप देण्यात येईल. रात्री मानकरी नागवेकर यांच्या घरातून संदल, गिलाफ (चादर) मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री शस्त्रांचा खेळ सादर होईल. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातिस मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.