स्वरा साखळकर ‘युथ आयडॉल’ पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी : समाजातील मूठभर लोकांच्या चांगुलपणावर समाजाचा रहाटगाडा ओढला जातो, या मूठभर लोकांच्या चांगुलपणाला काहीजण समाजकार्य म्हणतील तर काहीजण रिकामटेकडेपणा! मात्र रत्नागिरीचे सुपुत्र श्री. विकास साखळकर यांच्याकडे पाहिल्यानंतर दातृत्व म्हणजे काय हा प्रश्न सहज सुटतो. एक सर्वसामान्य चालक म्हणून काम करणारे आणि रक्तदान करणे हाच एक छंद मानून गेल्या १८ वर्षात तब्बल ४६ वेळा रक्तदान करणाऱ्या विकास साखळकर यांच्या कामाची कुणी दखल घेतली नाही तरच नवल! साखरकर यांना त्यांच्या सामाजिक योगदानासाठी समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले तर त्यांची कन्या स्वरा साखळकर हिला तायक्वांदोमधील तिच्या कामगिरीसाठी युथ आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
CBS न्यूज मराठी या चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विकास साखळकर यांना रक्तदान क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे हा पुरस्कार देण्यात आला. साखळकर यांचा हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार असून यापूर्वी 2022 साली क्रांतीसुर्य सामाजिक संघटना बारामती या संस्थेकडून समाजभूषण पुरस्काराने तर 2023 साली तथागत ग्रुप बुलडाणा या सामाजिक संस्थेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते
जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन दर तीन महिन्याने रक्तदान करणे, किंवा रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णास तातडीची आवश्यकता असताना रक्त उपलब्ध करून देणे ही श्री साखळकर यांची नित्य नियमाचीच कामे झाली आहेत.
स्वरा साखळकर हिला राज्यस्तरीय युथ आयडॉल पुरस्कार प्रदान
विकास साखळकर यांची कन्या स्वरा हिने तायक्वांदोमध्ये केलेल्या उत्तुंग कामगिरीमुळे तिला युथ आयडॉल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तायक्वांदोमध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, तसेच राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीने विशेष ठसा उमटवणाऱ्या स्वरा हिचा विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. स्वरा हिने आजपर्यंत टायकोंडो मध्ये 26 सुवर्णपदके 7 रौप्य पदके तर 9 कांस्यपदके मिळवून अल्पावधीतच सुवर्णकन्या होण्याचा मान मिळवला, नुकत्याच नोएडा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही तिने उल्लेखनीय कामगिरी केली होती
अकरा वर्षाच्या या चिमुरडीने केलेल्या या कामाची दखल CBS न्यूज मराठी चॅनल ने घेतली.
स्वरा इयत्ता पाचवी मध्ये शिकत असून रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी आहे, SRK तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख शेख यांच्याकडे ती तायक्वांदो चे प्रशिक्षण घेत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, व्याख्याते श्री अनंत राऊत ( मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा फेम ), क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावंत, CBS न्यूज चॅनल चे मुख्य संपादक चांद भैय्या शेख यांच्या हस्ते विकास साखळकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार तर स्वरा हिला राज्यस्तरीय युथ आयडॉल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, साखळकर यांना मिळालेल्या समाजरत्न तर स्वरा हिला मिळालेल्या युथ आयडॉल पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून दोघांवरही स्तुती सुमानांचा वर्षाव होत आहे
स्वरा इयत्ता पाचवी मध्ये शिकत असून रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी आहे, इतक्या लहान वयात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.