https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

उरणमधील सामवेदा लॉजिस्टिक इन्फ्रा रिसोर्सेस कंपनीतील माल चोरून आग लावल्याचे पोलिस तपासात उघड

0 293
  • चोरीची घटना लपविण्यासाठी वेअर हाऊसमध्ये लावण्यात आली आग
  • पोलिसांनी केला महत्वाचा उलगडा

उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील कंठवली येथे असलेल्या सामवेदा लॉजिस्टिक एन्फ्रा रिसॉर्सेस प्रा. ली. वेअर हाऊस या वेअर हाऊसमधील मालाला ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारासअचानकपणे आग लागली होती. या आगीत सुमारे १७,५६,१७,५०० रुपये (सतरा कोटी छप्पन्न लाख सतरा हजार पाचशे रुपये )इतक्या किमतीच्या मालाचे नुकसान झाले होते. या लागलेल्या आगीचा तपास पोलीस प्रशासनांतर्फे सुरु होता शेवटी या आगीमागील खरे कारण समोर आले आहे. खरे कारण समोर आल्याने अनेकांना आश्चर्यचा धक्काच बसला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार सामवेदा लाजिस्टिक वेअर हाऊस मधील सुमारे १,९७,८२,५०० रुपये किमतीचा माल (सुपारी मालाच्या ५०० गोणी. प्रत्येक गोण ५० किलो वजनाची, एका गोणीची किंमत ३९५६५ रुपये ) दिनांक ७/१/२०२४ रोजी २०:३० वा. ते दिनांक ८/१/२०२४ रोजी १.४५ वा. च्या दरम्यान वेअर हाऊस मधील मालाची चोरी झाली. विशेष म्हणजे हि चोरी त्याच वेअर हाऊस मधील कामगारांनी केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. शिवाय चोरीची घटना कोणाला समजू नये म्हणून कामगारांनीच वेअर हाऊसच्या मालाला आग लावल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कंपनीला आग लावण्याच्या अगोदर वेअर हाऊस मधील माल दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. अधिक तपास केला असता सुमारे दोन कोटी रुपयांचे माल चोरी करून अगोदरच दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आले व नंतर कंपनीतील (वेअर हाऊस मधील )मालाला कामगारांनी व इतर त्यांच्या साथीदारांनी जाणून बुजून आग लावली. या जाणून बुजून लावलेल्या आगीत वेअर हाऊसमधील सतरा कोटी छपन्न लाख सतरा हजार पाचशे रुपयाचे नुकसान झाले होते. सदर घटनेत वेअर हाऊस मधील मालाला लागलेली आग हि नैसर्गिक लागली नसून चोरी केलेला माल लपविण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर चोरी करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम ३८०,३८१,४३६,४२७,१२०(ब ),३४ या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.

१) रोमेश सुर्यकांत भुवड वय २५ वर्षे, रा. उरण

२) सिध्देश विजय रहाटे, वय २६ वर्षे, रा. उरण

३) किरण दशरथ पंडीत, वय ४० वषे, रा. कळवा, ठाणे

४) दिगंबर आनंदा वानखेडे, वय ५५ वर्षे, विंधणे, ता. उरण

५) संजय शंकर घाग, वय ५१ वर्षे, रा. विंधणे, ता. उरण

6) सचिन चंद्रकांत कदम, वय 36 वर्षे, रु. वाशी नाका, चेंबूर (पूर्व), मुंबई

७) पांडुरंग उर्फ पंड्या लक्ष्मण शेरेकर, वय ३३, रु. घणसोली गाव, नवी मुंबई व त्यांचे इतर साथीदार अशी त्या चोरी करणाऱ्या व्यक्तींची(आरोपिंची) नावे आहेत.

कोणालाही चोरीचे पुरावे सापडू नयेत याची पुरेपूर खबरदारी या आरोपीनी घेतली होती.चोरीचे पुरावे सापडू नयेत यासाठी वेअर हाऊस मधील केबिन व केबिन मध्ये असलेले प्रिंटर, महत्वाची कागदपत्रे, संगणक, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर व स्क्रीन, पंखे, एचपी, कंपनीचा प्रिंटर, दोन हॅन्ड ट्रॉली, इन व आऊट बॉण्डचे नोंदी असलेले रजिस्टर असे दहा लाख किमतीचे साहित्य व वस्तूना आग लावण्यात आली.मात्र सामवेदा लॉजिस्टिक वेअर हाऊस मध्ये आग लागली नसून आग लावण्यात आली होती. तसेच चोरीची घटना लपविण्यासाठी आग लावण्यात आली होती हे सत्य बाहेर येताच उरण मधील नागरिकांनी या घटनेवर मोठया प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.

या गुन्ह्याचा (घटनेचा )तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम,पोलीस निरीक्षक (गुन्हे विभाग )सूर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शिंदे, सपोनि अनुरुध्द गिजे, सपोनि शिवाजी हुलगे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुशांत दुड्डे,पोलीस उपनिरीक्षक सुरज कांबळे,पोलीस शिपाई माळशिकारे यांनी केले. उरण पोलीस स्टेशनच्या या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या धाडसी तपासाचे /कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.